मुलाखत म्हणजे काय व मुलाखतीचा मुख्य हेतू कोणता ?

दैनंदिन जीवनात आपण वृत्तपत्र अथवा दूरदर्शनद्वारे विविध मुलाखतींचा आढावा घेत असतो. मुलाखत या शब्दाची उत्पत्ती ही मुळात “मुलाकात” या अरबी शब्दावरून झाली आहे. मुलाखत ही नेमकी संकल्पन काय आहे, या संबंधित विविध माहितीचा आढावा, या लेखद्वारे घेणार आहोत,


मुलाखत म्हणजे काय ?

मुलाखत म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोकांमध्ये घडणारा प्रश्नात्मक संवाद अथवा संभाषण होय, ज्यामध्ये एक व्यक्ती प्रश्न विचारणारी, तर दुसरी व्यक्ती प्रश्नावर प्रतिक्रिया देणारी असते. मुलाखतीला इंग्रजीत इंटरव्हिव्ह (Interview) असे म्हटले जाते.

मुलाखती दरम्यान आणखी एक घटक अथवा वर्ग महत्वाचा असतो, तो घटक म्हणजे प्रेक्षक वर्ग, परंतु प्रेक्षक वर्गाचा मुलाखतीत अगदी कमी प्रमाणात सहभाग असतो अथवा काहीच सहभाग नसतो.

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीमत्वाला मुलाखतदार असे म्हणतात. मुलाखतदार हा समोरील व्यक्तीचे मत जाणून घेण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी, स्वतःची जीवन शैली सांगण्यासाठी, एखाद्या घटनेबद्दल संक्षिप्त माहिती प्रदान करण्यासाठी, अशा विविध अनुषंगाने एक प्रश्नावली तयार करतो. कोणत्याही मुलाखतीपूर्वी, त्या मुलाखतीचा विषय व मुलाखती दरम्यान साधल्या जाणारी संवादाबद्दल नियोजन केले जाते.


मुलाखतीचे प्रकार 

मुलाखतीच्या विविध प्रकारांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. संरचित मुलाखत

संरचीत मुलाखतीमध्ये मुलाखतदार एक ठराविक प्रश्नावली तयार करतो, व त्या प्रश्नावलीनुसारच मुलाखत पार पाडतो. प्रश्नावली तयार करण्याआधी मुलाखतकार, ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, त्यासंबंधित संपूर्ण माहिती जमा करतो, व माहितीला अनुसरून प्रश्न तयार करतो. संरचीत मुलाखत पद्धतीचा उपयोग एखाद्या कंपनीद्वारे उम्मेदवार निवडण्यासाठी केला जातो, यामुळे कंपनीच्या अथवा संस्थेच्या मुलाखतीतील पक्षपातपणा दूर होतो.  

2. असंरचित मुलाखत 

असंरचित मुलाखतीची संकल्पना ही संरचीत मुलाखतीच्या अगदी विरुद्ध असते, यामध्ये कोणत्याही प्रकारची पूर्व नियोजित प्रश्नवली तयार केली जात नाही, तर संवादा-संवादात, जे काही विषय उद्भवतील, त्यासंबंधित प्रश्न मुलाखतदाराद्वारे विचारले जातात. ही एक पारंपरिक मुलाखतीची पद्धत मानली जाते. 

असंरचित मुलाखतीचा उपयोग अधिकतर, प्रशासकीय विभागाद्वारे योग्य उम्मेदवाराची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड करण्यासाठी केला जातो. असंरचित मुलाखत कोणत्या दिशेने वाटचाल करेल, अथवा कोणत्या विषयावर जाऊन पोहोचेल, याचा अंदाज लावणे जरा कठीण असते.

3. विडिओ अथवा फोन कॉलवर आधारित मुलाखत 

जेव्हा एखादा उम्मेदवार अथवा व्यक्तिमत्व काही कारणास्तव मुलाखतीत उपस्तिथ राहू शकत नाही, अशा परिस्थिती विडिओ कॉल अथवा फोन कॉलवर आधारित मुलाखत घेतली जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोरोना काळ, जेव्हा अधिकतर मुलाखती या ऑनलाईन पद्धतीने व्हिडीओ अथवा फोन कॉलद्वारे घेतल्या जात होत्या. 

4. गट मुलाखत

गट मुलाखतीमध्ये साधारणतः मुलाखतदाराचा अथवा ज्यांची मुलाखत घ्यायची आहे, ते गट अथवा समूहात असतात. प्रशासकीय उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी गट समूह हा परीक्षेचा शेवटचा टप्पा असतो, ज्यामध्ये एक पेक्षा अधिक मुलाखतदार, तर एकाच उम्मेदवार उपस्थित असतो. तसेच अनेकदा आपण बातम्यांचे चॅनेल पाहत असतो, जेथे एक व्यक्ती २ किंवा त्यापेक्षा देखील अधिक लोकांची मुलाखत घेत असतो.

5. वन टू वन मुलाखत

वन टू वन मुलाखत, ही मुलाखत घेण्याची एक सर्वसाधारण पद्धत आहे, ज्यामध्ये मुलाखतदार आणि उम्मेदवार यांची संख्या एकच असते.


मुलाखतीचा मुख्य हेतू

मुलाखत घेण्याचे विविध पैलू अथवा हेतू असू शकतात. आपल्या समाजात अनेक लोकांचे जीवन, जणू एक संघर्षगाथा असते, जी जनसामान्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते, ती संघर्षगाथा अथवा त्या व्यक्तीने केलेल्या समाज कार्यावर प्रकाश टाकण्याच्या हेतूने मुलाखत घेतली जाऊ शकते. 

एखाद्या संस्थे अथवा कंपनीद्वारे, कंपनीकरिता एक उत्तम कर्मचाऱ्याची निवड करण्यासाठी, उम्मेदवारामधील कौशल्य जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा अनुभव कंपनीकरिता किती फायदेशीर ठरू शकतो, हे जाणून घेण्यासाठी देखील मुलाखत घेतली जाऊ शकते. 

समाजात घडणाऱ्या घटनांसंबंधित, घटनाग्रस्त व्यक्तिमत्व अथवा राजकारणी व्यक्तिमत्वाकडून घटनेचा उलघडा करण्यासाठी व सरकारद्वारे त्या घटने संबंधित, केल्या जाणाऱ्या उपाय-योजनांसंबंधित माहितीचा घेण्यासाठी अथवा वादविवाद करण्यासाठी मुलाखत आयोजित केली जाऊ शकते. 

एखाद्या परिसरासंबंधित माहिती जाणण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, कलांचा विस्तार करण्यासाठी असे विविध हेतू साध्य करण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. 


मुलाखतीचे स्वरूप

मुलाखत म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांमध्ये घडणारा संवाद असतो, जो बहुदा नियोजित केलेला असतो तर बहुदा अनियोजित असतो. मुलाखत ही केवळ मुलाखतदार म्हणजेच मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा ह्यांमध्येच पूर्ण होत नाही, तर मुलाखत पाहणारे प्रेक्षक, मुलखती संबंधित वृत्तपत्र वाचणारे प्रेक्षक, मुलाखतीत सहभाग घेणारे प्रेक्षक, या प्रेक्षक वर्गामुळे मुलाखतीला एक पूर्ण स्वरूप धारण होते. जेव्हा दोन अथवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये, एका क्रमबद्ध प्रश्न माध्यमातून उत्तर स्वरूपी घडणाऱ्या संवादाला आपण मुलाखत असे म्हणू शकतो. 

मुलाखती दरम्यान मुलाखतदार आणि मुलाखत देणारा यांच्यात वैचारिक आणि भावनिक संवाद घडत असतो. मुलाखतीचा मुख्य हेतू साधण्यासाठी आणि मुलाखत आयोजित करण्यासाठी प्रथम मुलाखतीचे स्थान, वेळ, विषय, दिवस, उद्दिष्ठे आणि व्यक्ती यांची आधीच निवड केली जाते. 

मुलाखतीमध्ये एकावेळी दोन व्यक्तिमत्व संवाद साधू शकतात, ही मुलाखत फोन कॉल अथवा विडिओ कॉलवर देखील आधारित असू शकते.  

एखाद्या ठराविक विषयावर श्रोत्यांचे आकर्षण प्राप्त करण्यासाठी, मुलाखतीची एक विशेष अशी रचना तयार केली जाते. मुलखत ही पैसे कमावणे, स्वतःचे अनुभव प्रकट करणे, मागदर्शन करणे अशा विविध स्वरूपाची असू शकते. 

जे व्यक्तिमत्व लोकप्रिय आहे, अथवा ज्या व्यक्तिमत्त्वाकडे काही तरी सांगण्यासारखे आहे, अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत आयोजित केली जाते, यामध्ये खेळाडू, राजकारणी, कवी, लेखक, वैज्ञानिक, राष्ट्रपती, जिल्हाधिकारी, समाजसेवक, साधू, ऍक्टर, व्यावसायिक, तज्ज्ञ, सैनिक, शेतकरी, पुरस्कार मानकरी अथवा विजेता, इतिहासकार इत्यादींचा समावेश असू शकतो. 


मुलाखतीची पूर्वतयारी

न केवळ मुलाखत, तर कोणतीही गोष्ट अथवा कार्य यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी, त्याची पूर्वतयारी अथवा पूर्वनियोजन करणे फार गरजेचे असते. एखादी मुलाखत घेण्यापूर्वी, त्यासंबंधित पूर्वनियोजन कसे करावे हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत, 

 • ज्या व्यतिमत्वाची मुलाखत घ्यायची आहे, प्रथम त्याची निवड करणे. 
 • मुलाखतीची वेळ, स्थान, विषय आणि दिवस निश्चित करणे. 
 • ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत, त्यासंबंधित माहितीचा आढावा घेणे असणे गरजेचे असते, जसे कि वय, स्वभाव, कर्तृत्व आणि अधिक.  
 • मुलाखती दरम्यान कोणते व किती प्रश्न विचारले जाणार आहेत, हे निश्चित करणे. 
 • मुलाखतीचे स्वरूप ठरवणे, म्हणजे मुलाखत समोरासमोर होणार आहे, कि फोन कॉलवरून होणार आहे, हा निर्णय घेणे. 
 • मुलाखतीकरिता योग्य बैठय व्यवस्थेचे नियोजन करणे
 • मुलाखतीचा हेतू सध्या करणे. 

मुलाखती दरम्यान काय करावे ?

एखादी मुलाखत यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी, कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घ्यायला हवा व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोतं,

मुलाखती दरम्यान कोणत्या गोष्टी कराव्यात :-
 • मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने समोरील व्यतीचा मान मर्यादा ठेऊन प्रश्न विचारणे 
 • मुलाखत देणाऱ्यांवर कोणत्याही प्रश्नासंबंधित जबरदस्ती करू नये. 
 • मुलाखती दरम्यान प्रेक्षकांना देखील सहभाग घेण्याची संधी द्यावी. 
 • मुलाखतीकरीता एक औपचारिक वातावरण निर्माण करणे. 
 • नियमांचे उल्लंघन न करता मुलाखत घ्यावी. 
 • मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला बोलण्याची अधिक संधी द्यावी 
मुलाखती दरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्या :-
 • एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नये 
 • मुलाखत देणाऱ्याचा कोणत्याही पद्धतीने अपमान होईल असे वागू नये. 
 • मुलाखतीच्या मुख्य विषयावरून भरकटू नये. 
 • मुलाखत ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ चालू नये. 
 • तणाव जन्य वातावरण निर्माण होईल, असे प्रश्न विचारू नये. 
 • पूर्व नियोजन न करता मुलाखत घेऊ नये. 

नोकरीकरीता मुलाखत देण्यापूर्वी कोणती तयारी करावी ?

नोकरी करीता मुलाखत हा प्रत्येक व्यक्तीच्या करिअर मधील एक सर्वात महत्वाचा पैलू असतो. नोकरी करीता मुलाखत देण्यापूर्वी अथवा मुलाखतीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अमलात आणाव्यात, या संबंधित माहितीचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

 • कोणत्या पदासाठी अथवा कामासाठी मुलाखत घेतली जात आहे, या बद्दल माहिती मिळवणे.
 • मुलाखती पूर्वी स्वतःचा एक आकर्षक रेस्युम तयार करणे.
 • इस्त्री केलेल्या फॉर्मल कपड्यांचा पेहराव करणे.
 • आत्मविश्वासासहित मुलाखतदारासमोर जाणे.
 • ज्या कंपनीत अथवा संस्थेत मुलाखतीसाठी जाणार आहोत, त्या कंपनी संबंधित माहितीचा मिळविणे.
 • मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची तयारी करणे.
 • आपल्या सर्व शिक्षणासंबंधित आणि अनुभवासंबंधित कागदपत्रे गोळा करणे.

अधिक लेख –

1. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय व याचे नियम कोणते ?

2. ई संवाद म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते ?

3. संदेशवहन म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

4. इंटरनेट म्हणजे काय व इंटरनेटचे फायदे कोणते ?

Leave a Comment